सहजच!

 ● समुद्रकिनारी उभे असताना

जेव्हा क्षितिजाकाठी मावळतीचा सूर्य आपण पाहतो,

तेव्हा दिसून येते की त्याच्या प्रतिबिंबामुळे 

एक सुंदर, सोनेरी, धुसर अशी वाट पाण्यावर भासते..

आयुष्यातील क्षणिक व्यक्तीदेखील त्या वाटेसारखे असतात;

पण त्यांची साथ तोपर्यंतच असते 

जो पर्यंत आपल्या हातात सुखाचा आणि सत्तेचा सूर्य असतो, 

त्याच्या थोड्या कालावधी नंतर ती विलुप्त होऊन जातात..

तर दुसरीकडे, आपली हक्काची माणसं समुद्रातील निखळ पाण्यासारखी असतात,

त्यांचा प्रवाह बदलतो कधीतरी..

पण मुळात सूर्य उगवतीचा असो किंवा नसो,

सागरातील पाण्याचं अस्तित्व मात्र शाश्वत असतं..!



●लिहिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या लिखाणामागे प्रेरणा असणं गरजेचं आहे का?

मी जे काही लिहिते ती भावना अनुभवलेली असावी किंवा माझी ती अनुभवायची इच्छा असावी हे गरजेचं आहे का?

व्यक्तीच्या लेखनातून तिचं व्यक्तिमत्त्व कळतं हे बोलणं काही लोकांना गरजेचं आहे का?

मुळात लोक काहीही बोलो, मी मनाला लावणं गरजेचं आहे का?

मनाला जर लावलं, तर माझ्या लिखाणात ते दिसणं गरजेचं आहे का?

लिखाणात दिसून ही आलं, पण ग्राह्यतेची आस धरणं गरजेचं आहे का?

आता तर वाह वाह केली लोकांनी, पण मनाविरुद्ध वागण्याचा पश्चाताप होणं गरजेचं आहे का? 

काय गरजेचं, काय नाही - हा अतिविचार गरजेचा आहे का?

अतिविचार माझ्या लिखाणाची प्रेरणा आहे असं वाचणाऱ्याला वाटणं गरजेचं आहे का?



●वातावरण खूप विचित्र होत चाललंय..

सकाळ सकाळ थंडी,

दुपारी इतक्या गरम वाफा

आणि संध्याकाळी वादळच सुटलं..

आता फक्त पाऊस पडायचा बाकी..

चालू असलेल्या 'मौसमा' सोबत

जुळवून घेण्याचा प्रयत्न सुरु करते न करते

तितक्यात पार बदलूनच जातो माहोल..


आता वारा सुटलाय खूप..

असं वाटतंय की प्रेमात पडलेल्या दोन व्यक्तींची अखेर भेट होणार आहे...

पण थोडंफार उकडतंय ही...

किंबहुना त्यांच्या प्रेमाच्या प्रवासातल्या अडचणी दूर नाही होणार इतक्यात..


अचानक कडेकडेला उभ्या असलेल्या झाडांची पानगळ सुरु होते...

कदाचित ही भेट जरी झाली तरी ती अखेरची ठरू शकते...

तेवढ्यात ढगाआड लपलेला सूर्य डोकावतो आणि एक नितळ प्रकाश पडतो पानांवर..चमकतात ती..

बहुतेक त्या दोघांनी ठरवलंय की बंधनांना न जुमानता, न हार मानता आपण लढायचं..


पाऊस पडायला लागला...गारवा पसरतोय..

त्यांच्या प्रेमाला यश येतंय...ते दूर निघाले..ओळखीच्या माणसांपासून, रस्त्यापासून आणि त्यांच्या प्रेमाची साक्ष असलेल्या शहरापासून...

थांबला पाऊस, त्या एका सरीने सुखावले सगळे

पण...

पण परत उन्हाचा कडका..

ऊन टोचायला लागलं..

इतकं की गारवा दिलेल्या सरीला सगळे कोसू लागले..

एकमेकांकडे बघत होती ती दोघे..

नव्या संसाराची स्वप्न बघत असताना

वास्तविकतेचे चटके मात्र त्रास देत होते..

आयुष्य हवंय खरं पण ते निभावण्यासाठी ना अनुभव, ना भांडवल...

निघून आले ते बेफाम..कशाची पर्वा न करता..


खूप गरम होतंय...नकोसं करुन ठेवलंय

आता फक्त त्या एका सरीची आस आहे लोकांना..

क्षणिक का होईना..

ती दोघं रोज भांडत आहेत..

छोट्या छोट्या कारणांवरुन.. एकमेकांविरुद्ध तोंड फिरवून

दिवसभर...पण मावळतीची वाट बघत..

त्या जवळीकतेसाठी..

रात्रीपुरती का असेना..







Popular posts from this blog

The Flip Side..

Silence