Wait and Watch.

 चातुर्वर्ण्य सोहळा मोठा

पंचमुखी होतो आता,

सत्ता नावाचा नवा वर्ण

समाजाला उमजे आता..


जात मिळवी अदृश्यता

संपत्तीची हाव आता,

'कल्याणकारी राज्य'

संविधानात बंदिस्त आता..


आकडे-तत्व-पक्ष बदलले

सरकारचा प्रश्न आता,

चहापान चाले वर पण

कार्यकर्ता उदास आता..


शिक्षण, पाणी, पर्यावरण

संशोधनापरी सीमित आता,

निवडणूक फिरे चेहऱ्यांभोवती

चेहरे सारे समान आता..


अपक्षाला कोण विचारे

घराणेशाहीचा बाजा आता,

सहकारातून साधण्यात येते

वैयक्तिक हित आता..


सत्ता कधी वाईट नसे

पण सत्ताधारी भ्रष्ट आता,

'राज-का-रण' अनर्थ होई

यथार्थ ही नष्ट आता..


'राजकीय वारसा' मोठा असे

अस्तित्व न दिसे आता,

संपली ही मूल्ये सारी

'Wait and watch' खेळ आता!


- सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागातर्फे प्रकाशित होणाऱ्या 'Raajneetique' या वार्षिक मासिकासाठी.