माझ्या कविता!

 

१. तू !


गालिचा शोभिवीत सडांचा

मोगरा-मोहराने गंधयुक्त तू,

नाविन्याची चाहूल देत येशी

माझा बहरलेला चैत्र तू!


पेट धरणारा क्रोध पाहुनी 

वणव्यासम वाऱ्यामध्ये आभासे तू,

घेऊनी पुण्य अक्षय तृतीयेचे

बनूनी वेळीस वैशाख येतोस तू!


आणूनी सणांची मांदियाळी अन् 

ऊन-पावसाचा मिलाप तू,

वटपौर्णिमा-मंगळागौरचे सौख्य

सवाष्णींना लाभविणारा ज्येष्ठ तू!


बिजासाठी आणे मातीत मार्दव

रिमझिम सरींनी स्पर्शतो तू,

भक्तिमय करुनी एकादशी

तेजोमय करणारा आषाढ तू!


सणांना, नात्यांना जपत-वृद्धिंगत

सुखसरींनी न्हाऊ घालीशी तू,

असीम प्रसन्नतेने-निसर्गरम्यतेने

मोहणारा जसा श्रावण तू!


करुनी राधा-कृष्णासम प्रेमवर्षाव

अलंकृनी बाप्पाची निरागसता तू,

मिरवुनी गडद गुलाबी, सफेद, लाल-

रंगबिरंगी तेरड्याचा भाद्रपद तू!


उधळलेल्या शरद-चांदण्यातील

कोजागिरीचा पूर्णचंद्र तू,

घनदाट अमावस्येच्या अंधारात

दिव्यांनी लखलखणारा अश्विन तू!


बंधनांमध्ये करुनी रोषणाई

विविधतेची रेखाटतो रांगोळी तू,

साजरी होते मनातील दिवाळी

जेव्हा होऊनी कार्तिक येशील तू! 


पीक खरीपाचे भरून घरी

लक्ष्मीच्या अंशासह पवित्र तू,

महिन्यांमधला जणू कृष्ण 

असा भावपूर्ण मार्गशीर्ष तू! 


वाण-भोगीची लगबग असता

गोड बोलुनी येतोस बरा तू,

हरवाया तुझ्यात घेते पतंगी झेप

दाटून येता धुक्याचा पौष तू!


सभोवतीच्या ग्रीष्म-दाहकतेला

शीतलतेचा लेप लावी तू,

पानगळीच्या निराशेनंतरचा

नवी पालवी देणारा माघ तू!


मिळवूनी विजय दुर्गुणांवर

करी धुळवड रंगांची तू,

वसंतास वराचे, भूमीवर वधूचे-

चैतन्य खुलवणारा फाल्गुन तू!


तुला पाहणे, तुला जाणणे

बारा मासांत नखशिखांत तू,

जणू हृदय माझे पंचांग अन् 

तिथी, वार, नक्षत्र, योग, करण तू!

 


२. पाऊसवेडी!


विचारांच्या गुंता-गुंतीत

वाटे मिळावे नवे वळण,

चंचल मन ते अवेळी

बसले मिटून नयन..


कल्लोळ उरी भावनांचा

मनी आस शितलतेची,

तप्त सूर्य होता शिरी

भीती होती अस्तित्वाची..


माझ्या मनीचा दाह

ओळखत तो बरसला,

सूर्य गेला ढगामागे

जणू भिऊन लपला...


पाहुनी शुष्क मन माझे

फूटे मेघास पाझर,

नखशिखांत ओलेचिंब

आलं फुलून मन साजरं..


भावनाहीन मन आनंदे

ओसंडून वाहून गेले,

निरभ्र आकाशात त्या

इंद्रधनू खुलुन आले..


पानांवरच्या दवबिंदूंत

स्वरूप हळूच मी पाहिले,

निसर्गाच्या त्या किमयेचे

गालात हसूनी स्वागत केले...


संततधार त्या जलधारा

सातत्य देती प्रयत्नांना,

बुडणार नव्हती नाव माझी

ती पाण्यात सोडताना..


केवळ एकाच सरीने

अंतर्बाह्य मी नाहले,

आतुर दुसऱ्या सरीस ही

मी 'पाऊसवेडी 'झाले..



२. तो आणि ती...


देखणा 'तो' कप चहाचा

सूर मारण्या 'ती' जीभ जळते,

'तो' ताव मारण्या हात उचलता

'ती' ढेकर तृप्तीची पावती देते..


'तो' टेबल पाही काम रुबाबात

पण नजरेत बसे ती 'खुर्ची'

'तो' ठेचा रेंगाळे जिभेवर

अंतरी ठसका देई 'ती' मिरची!


'तो' सदरा भारी उठून दिसतो

पण नजरेत 'ती' साडीच भरे,

'तो' गोड शिरा जरी देवापुढे 

'ती' तुळस त्याचा प्रसाद करे..


'तो' Mempad मिरवे आज 

पण आसऱ्याची 'ती' डायरीच खरी,

यशासाठी 'तो' शॉर्टकट नको,

अपयशाची 'ती' पायरीच बरी!


स्वप्नापूर्तीच्या 'तो' प्रवास जरी

पण महत्वाची 'ती' वाट असते,

खोल-असिमीत 'तो' समुद्र,

भावणारी 'ती' लाट असते..


'तो-ती' च्या या खेळात नेहमी

पारडे तिचेच जड होते,

ओझं वाहणारा 'तो' जीव बिचारा

पण दिलासा 'ती' मायाच देते!